आपल्याच पण घातक सवयी
चेहऱ्याला स्पर्श करणे
वारंवार चेहऱ्याला स्पर्श तसेच तळ हाताने पुसण्याची सवय अनेकांना असते. मुरुम किंवा पुरळ चेहऱ्यावर येतात तेव्हा ते फोडण्याची किंवा खाजवण्याची सवय असणारेही बरेच आहेत. याच सवयी चेहऱ्याच्या त्वचेसाठी नुकसानदायक ठरतात. म्हणून अशा सवयी वेळीच बंद करायला हव्यात. आपला चेहऱ्यावरील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. अशा सवयींमुळे चेहऱ्यावर जंतूसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. मुरुम इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वारंवार स्पर्श करणेही टाळायला हवे.
वारंवार डोळे चोळणे
डोळ्यांभोवती आणि ओठांवर वाढणाऱ्या सुरकुत्या चिंता अन् काळजी वाढविणाऱ्या असतात. त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी ही समस्या मानसिक त्रास देणारीच असते. ही समस्या का उद्भवते हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वारंवार डोळे चोळण्याची सवय, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. अकारण डोळे चोळण्याचे प्रमाण जेवढे असेल तेवढ्या सुरकुत्या वाढत जातात. त्यामुळे अकारण डोळे चोळू नये. डोळे आणि ओठांच्या भोवतालची त्वचा अतिशय संवेदनशील असते. चुकीच्या सवयींमुळे तसेच हातावरील जंतू डोळ्यांत किंवा ओठांवर लागल्याने त्वचेवरील संसर्ग वाढून त्रास वाढू शकतो. म्हणून डोळे चोळण्याची सवयी बंदच करायला हवी. डोळे पुसण्यासाठी मऊ आणि साध्या कापडाचा वापर करावा.
ओठ चाटणे अन् चावणे
ओठावरील त्वचा खुप नाजूक आणि संवेदनशील असते. मात्र याच ओठांची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. ओठांना जिभेने वारंवार चाटणे तसेच दातांनी ओठ चावणे ही सवय अत्यंत वाईट आहे. यामुळे ओठांचे साैंदर्य नष्ट होण्याची भिती असते. ओठांच्या त्वचेला अनेक स्तर आहेत आणि ते स्तर अत्यंत पातळ आहेत. अशा चाटण्याच्या आणि चावणाच्या सवयींमुळे ओठावरील कवच निघून ते अधिक कोरडे होते. कालांतराने ओठांचा मऊपणा आणि सौंदर्य नष्ट होत जाते. ओठ काळे पडतात. तसेच कोरडे झाल्यामुळे इन्फेक्शन वाढून विविध समस्या उद्भवतात. म्हणून अशा सवयी कटाक्षाने टाळायला हव्यात. अन्यथा शारिरीक आणि मानसिक आजार वाढून आपल्या दैनंदिन कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा